गुवाहाटी - आसाममध्ये आयोजित मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने गुवाहाटी दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा ताई पवार यांनी आज गुवाहाटीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैचारिक परंपरेशी जोडलेले स्वर्गीय शरदचंद्र सिन्हा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
स्वर्गीय शरदचंद्र सिन्हा यांचा आसामच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा वारसा आहे. ते आसामचे माजी मुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या वैचारिक भूमिकेशी त्यांचे घनिष्ठ नाते होते. त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना सुनेत्रा ताई पवार यांनी पक्षाच्या मूल्यांप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, पक्षाचे नॉर्थ ईस्ट समन्वयक संजय प्रजापती, पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डी. डी. अधिकारी, आसाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित हजारिका, कार्यकारी अध्यक्ष महेंद्र भुईयां, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष अनुपाल दास तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बिष्णू प्रसाद दास यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साह आणि आत्मीयतेने सुनेत्रा ताई पवार यांचे स्वागत केले.
या बैठकीत संघटना अधिक सशक्त करण्याबरोबरच आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि पूर्वोत्तर भारतात पक्ष विस्तार या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. युवा कार्यकर्त्यांचा उत्साह, पदाधिकाऱ्यांमधील समन्वय आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा पाहून पूर्वोत्तर भारतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात अधिक सक्षमपणे वाटचाल करेल, असा विश्वास सुनेत्रा ताई पवार यांनी व्यक्त केला.
उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानत सुनेत्रा ताई पवार यांनी सांगितले की, पक्षाची विचारधारा आणि शरद पवार साहेबांचा वारसा पुढे नेण्यासाठी पूर्वोत्तर भारतातील कार्यकर्त्यांचे योगदान अनमोल आहे. आजच्या या भेटीनंतर पूर्वोत्तर भारतातील राष्ट्रवादीच्या वाटचालीला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, सुनेत्रा ताई पवार यांची ही भेट केवळ औपचारिक नसून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय विस्ताराच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.